नेमेची येतो पावसाळा...पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा

Update: 2021-06-09 10:48 GMT

मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. यावरुन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.

विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी 107%..कधी 104%... दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने "वाझे"..

पहिल्या पावसातच "कटकमिशन"चे सगळे व्यवहार उघडे. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा...नेमेची येतो पावसाळा...पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

मुंबईत सुमारे 252.74 किमी लांबीचे एकुण 170 मोठे नाले तर 438.9 कि.मी लांबीचे छोटे नाले, पेटीका नलिका 621.46 किमी., रस्त्याच्या बाजूची उघडी गटारे 1991.69 किमी. जाळया संख्या 1,90,488, भूमिगत कमानी /नलिका पर्जन्य जलवाहिन्या 565.41 किमी असून यांच्या साफसफाई साठी दरवर्षी सुमारे 150 कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो. दरवर्षी नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात पण किती गाळ काढला त्याच्या वजनाच्या पावत्या, कुठे टाकला त्याचे सीसीटीव्ही फुटेज असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत.

आम्ही गेली अनेक वर्षे नालेसफाईच्या कामातील फोलपणा प्रत्यक्ष जागेवर जाऊन उघड करतो आहोत. पण कंत्राटदारांंना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतो. कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी यांची अभद्र युती महापालिकेत असून त्यांनी गेल्या पाच वर्षात नालेसफाईच्या नावावर सुमारे 1 हजार कोटींचा घोटाळा करुन तिजोरीवर डल्ला मारला आहे.

यावेळी महापालिकेने 107% तर कालच 104% नालेसफाई झाली असा दावा केला होता आणि आज सकाळी पडलेल्या पावसाने हे सगळे दावे वाहून नेले आहेत, अशा शब्दात आमदार अँड आशिष शेलार यांनी सत्ताधारी पक्षाचा समाचार घेतला आहे.

दरम्यान दोनच दिवसापूर्वी आमदार अँड आशिष शेलार यांनी गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत नालेसफाईचा दौरा करुन न झालेल्या कामांचा पर्दाफाश केला होता. आज पावसाने ते अधिकच उघडे केले आहे.

Full View
Tags:    

Similar News