अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने गुरुवारी डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्याशी संबंधित असलेल्या जागांवर छापा टाकला. मुंबई आणि पुण्यातील सहा ठिकाणी ED ने हे छापे मारले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ईडीने दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
छाब्रिया, त्याची बहीण आणि इतरांविरुद्ध २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजेंस युनिट (CIU) आणि EOW (आर्थिक गुन्हे शाखा) यांनी नोंदवलेल्या प्रकरणांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. दिलीप छाब्रिया (DC) डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून (NBFC) कथितपणे ग्राहक म्हणून कर्ज घेतल्याचे आढळून आल्याने मुंबई पोलिसांच्या CIU पथकाने २८ डिसेंबर २०२० रोजी दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती.
दिलीप छाब्रिया यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. दोन सीआययूने आणि एक मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने. छाब्रियाने डीसी अवंती नावाची कार बनवली होती जी अनेक कार शोमध्ये दाखवली गेली होती आणि ती भारतातील पहिली स्पोर्ट्स कार असल्याचे म्हटले जात होते.
काय आहे प्रकरण ?
छाब्रिया यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात, अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की छाब्रिया यांनी काही NBFC (नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन) च्या अधिकार्यांशी संगनमत करून त्यांच्या कंपनीकडून कार खरेदी केलेल्या ग्राहकांच्या नावाचा वापर करून प्रति कार 42 लाख रुपये कर्ज घेतले आणि नंतर ते कर्ज फेडण्यात छाब्रिया अयशस्वी ठरले. ज्यामुळे NPA झालं. छाब्रिया यांचा मुलगा, बहीण आणि एनबीएफसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.