मोदींच्या लोकप्रियतेत 22 टक्क्यांनी घट; सर्वेक्षणातून आलं पुढं
कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारबद्दल लोकांचा विश्वास कमी झाला आहे.
मुंबई: सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारमध्ये असलेल्या लोकांना जरी सर्व काही आलबेल असल्याचं वाटत असले तरीही त्याचं राजकीय नुकसान होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी होत असल्याचं समोर आलं आहे.'मॉर्निंग कन्सल्ट' नावाच्या अमेरिकन संस्थेने म्हटले आहे की, सप्टेंबर 2019 पासून नरेंद्र मोदींची लोकप्रियता 22 टक्क्यांनी कमी झाली आहे.
'मॉर्निंग कन्सल्ट'चा दावा
राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या 'मॉर्निंग कन्सल्ट'ने म्हंटलं आहे की, त्यांनी ऑगस्ट 2019 पासून पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचे सर्वेक्षण करण्यास सुरवात केली. त्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. 'मॉर्निंग कन्सल्ट' पुढे म्हणते की, नरेंद्र मोदी यांचे या आठवड्यातील रेटिंग 63 टक्के होती,जी एप्रिल महिन्याच्या तुलनेत 22 पाइंटने घसरली आहे. सर्वेक्षणानुसार, महानगरांमध्ये कोरोनाचा वाढत्या उद्रेकामुळे मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे.
मॉर्निंग कन्सल्ट कंपनीने मोदींवर केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. या सर्वेक्षणानुसार कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारबद्दल लोकांचा विश्वास कमी झाला आहे. या सर्वेक्षणात फक्त 59 टक्के लोकांनी सरकारने चांगलं काम केल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाटेत आशा लोकांची संख्या 89 टक्के होती. मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणाचा अहवाल अशावेळी आला आहे, जेव्हा ग्रामीण भागात आता कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही राज्यात नद्यांमध्ये कोरोना रूग्णांचे मृतदेह आढळून येत आहे. गंगा नदीच्या काठावरील वाळूमध्ये हजारो मृतदेह पुरल्याच्या बातम्या आहेत.