UP Election : अपयश झाकण्यासाठीच मोदींचा आटापिटा, प्रियंका गांधी यांचे मोदींना प्रत्युत्तर

कोरोनाच्या संसर्गाला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप मोदींनी केला. त्यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.;

Update: 2022-02-08 02:38 GMT

एकीकडे पाच राज्यांच्या निवडणूकांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर घणाघाती टीका केली. तर देशात कोरोना पसरण्यास विरोधक जबाबदार असल्याचा आरोप केला. त्या आरोपांना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जोरदारा प्रत्युत्तर दिले.

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गास विरोधकांना जबाबदार धरले. तर यावेळी मोदी म्हणाले की, ज्यावेळी जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील तज्ज्ञ सांगत होते की, जिथे असाल तिथे थांबा. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार थांबवता येईल. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सरकारने बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब राज्यातील लोकांना मोफत बस आणि रेल्वेची तिकीटे काढून तुमच्या राज्यात जा असे सांगितले. त्यामुळेच बिहार उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये कोरोनाचा प्रसार झाला, असे सांगतानाच कोरोनाच्या प्रसाराला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप मोदींनी केला. तर उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब निवडणूका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींनी भाषण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.

काँग्रेसने पंतप्रधानांच्या आरोपाला उत्तर देताना म्हटले की, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळेच महाराष्ट्रात जे लोक अडकून पडले होते त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहचवण्याची जबबादारी महाविकास आघाडीने घेतली. उत्तरप्रदेश बिहारच्या सीमा बंद केल्या त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने मजूरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले. त्यावेळी लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले, त्याचाच जाब उत्तरप्रदेशात विचारला जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रावर आरोप करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देतांना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, कोरोनाकाळात मोदींनीच देशाला वाऱ्यावर सोडले. सध्या सुरू असलेल्या निवडणूकींतील महत्वाचे मुद्दे मागे पडावेत आणि केंद्र सरकारचे अपयश झाकले जावे, म्हणूनच मोदींनी आरोप केले आहेत. याबरोबरच कोरोनाच्या साथीला आळा घालण्यास राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

Tags:    

Similar News