रायगड – सुधागड तालुक्यात वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा, बिल न भरल्यामुळे बंद असलेले पथदिवे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार तक्रार करुनही याबाबत कारवाई होत नसल्याने अखेर मनसेने आक्रमक भूमिका घेत थेट वीज वितरण कार्यालयातच आंदोलन केले. सुधागड तालुक्यातील जनता वीज समस्येने गेल्या कित्येक वर्षांपासून हैराण झाली आहे. अनियमित वीजपुरवठा, वाढीव बिल यामुळे येथील जनतेत असंतोष खदखदत आहे. यासाठी सुधागड मनसेतर्फे गुरुवारी पाली महावितरण कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वारंवार खंडीत होणारी वीज व गणरायाचे आगमन काही दिवसांवर आले आहे, तरी देखील तालुक्यातील पथदिवे चालू करण्यात आले नाहीत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असे मनसेतर्फे सांगण्यात आले.