आमदार संजय मामा शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या रस्त्यावरुन प्रवास करुन दाखवावा: तरुणांचे चॅलेंज

Update: 2021-10-07 07:30 GMT

सध्या नितीन गडकरी मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे तयार करत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. करमाळा तालुक्यातील 'फिसरे ते कोळगाव मार्ग गौंडरे' या मार्गावर हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव ही प्रत्येकी २००० च्या आसपास लोकसंख्या असणारी गाव आहेत. हाच मार्ग पुढं मुस्लिम समाजाचे देवस्थान आवाटी या दर्ग्याला जातो. रोज या मार्गावर शेकडो नागरिकांची ये जा असते.

पण सध्या या मार्गाची अवस्था अशी झाली आहे की, एखाद्या रुग्णाला या मार्गावरून घेऊन जाताना, डॉक्टरपर्यंत जाण्याआधी रस्त्याच्या दुरावस्थेनेच त्याचा प्राण जाईल. इतकी भीषण अवस्था निर्माण झाली आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून एकदाही हा पूर्ण रस्ता पक्का बनवला गेला नाही, हिवरे, कोळगाव पर्यंत टप्प्याटप्प्याने बऱ्याचदा रस्त्याची कामे केली पण पहिला तुकडा उद्ध्वस्त झाल्यावर पुढचं काम! अशी अवस्था.

या पावसाळ्यात तर रस्ता आहे की नाही.? हे शोधावं लागत आहे. रस्ता उरलाच नाही, उरलेत ते फक्त खड्डे आणि पाण्याची डबकी! त्या डबक्यात आता लवकरच कोळगावची तरुणाई वृक्षारोपनाचे अनोखे आंदोलन करणार आहे.

करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे, माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे करमाळयाचेच आहेत ते अनिरुद्ध कांबळे यांनी 'फिसरे ते कोळगाव मार्गे गौंडरे' या रोडवरून प्रवास करावा, त्यांचा खास सत्कार करण्यात येईल. असे विशेष चॅलेंज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मौजे कोळगाव गावच्या तरुणाईने जाहीर केले आहे.

नेते मंडळी निवडणूकीच्या वेळी मतं मागायला गाड्यांचा ताफा घेऊन येतात ते पुन्हा खेडेगावात फिरकतचं नाहीत. त्यामुळे गावगाड्यातील जनतेचे काय हाल चालले आहेत? हे त्यांना माहीतच होतं नाही. आणि ते त्यांना माहीत ही करून घ्यायचं नसतं. हेच या गावागावातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण जीव मुठीत घेऊन या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करतात. त्यांच्या जीवच महत्व जाणून वेळीच हा रस्ता दुरुस्त करावा. असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News