परिवहन मंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करा; आमदार रवी राणा यांची मागणी
अमरावती : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस दिली आहे, मात्र त्यापूर्वी ते ज्या ज्या ठिकाणी ते राहतात, त्यांचे कार्यालय या ठिकाणी ईडीने धाडी टाकायला पाहिजे असं म्हणत अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी अनिल परब आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना तातडीने ईडीने ताब्यात घ्यायला हवे, त्यांना वेळ देऊ नये अन्यथा त्यांच्या विरोधातील पुरावे ते नष्ट करतील असं आमदार राणा यांनी म्हटले आहे. सोबतच परब हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असून 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ते कामं करत असल्याचा गंभीर आरोप राणा यांनी केला आहे.
अनिल परब यांनी ईडीकडे दोन दिवसाचा वेळ मागितला त्यामुळे दोन दिवसात पुरावे नष्ट होऊ शकतात असं राणा यांनी म्हटले आहे.
अनिल परब यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांचे देखील काळे उद्योग राज्याच्या जनतेसमोर येतील असे विधान राणा यांनी केले आहे.