आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, 50 फुट नदीत कोसळली गाडी
सातारा जिल्ह्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत.
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान सलग दोन दिवसांच्या सुट्या आल्याने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे मतदारसंघात जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान पुणे-पंढरपूर रोडवर फलटणजवळ जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जयकुमार गोरे यांच्या छातीला जबर मार लागला आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जयकुमार गोरे हे पुणे-पंढरपूर रस्त्याने मतदारसंघात निघाले होते. दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पहाटे साडेतीनच्या सुमारास बाणगंगा नदीच्या पुलावरून जयकुमार यांची गाडी 50 फुट खोल दरीत कोसळली. यामध्ये जयकुमार गोरे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र अपघात झाला त्यावेळी जयकुमार गोरे यांच्या गाडीत चालक दडस, स्वीय सहाय्यक साळुंखे व रक्षक बनसोडे हे चौघे होते.
या अपघातानंतर जयकुमार गोरे यांना रुबी हॉस्पिटल येथे तर एकाला फलटण येथील निकोप हॉस्पिटल, दोघांना बारामती येथील गिरीराज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिस व कार्यकर्ते तातडीने अपघातस्थळी दाखल झाले.