चित्रकार आणि शिल्पकारांवरचा मुख्यमंत्र्यांचा "फोकस" का वळला नाही- आशिष शेलार

Update: 2021-10-24 01:28 GMT

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असताना राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवरचा त्यांचा "फोकस" का नाही वळला असा सवाल भाजपा नेते तथा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे . राज्य शासनाने चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी अशी मागणी शेलार यांनी केली.

राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . "राज्यात सुमारे 10 हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर करतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कोरोनाकाळात गेल्या दीड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंताचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशील पणे विचार करण्याची गरज होती," असे शेलार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा उपेक्षित घटकाकडे फोकस वळला नाही असं म्हणत शेलार पुढे बोलताना म्हणाले की, कर्नाटक, चंदिगडसारख्या राज्यांनी आपापल्या राज्यातील कलावंताना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत. मात्र, या उपेक्षित घटकाकडे त्यांचा फोकस वळला नाही. याचीच आठवण करुन देण्यासाठी आज आम्ही राज्यपालांना भेटलो. या कलावंताना सरकारने मदत करावी अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली.

तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. ज्याचा जावई अमली पदार्थाच्या गुन्ह्यात पकडला गेला त्या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा लोकांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्थ्यांवर वसुलीत अधिकारी लावले जातात. मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात.असा घणाघात शेलार यांनी केला.तसेच देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे. मात्र सध्या महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय. 'काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही' असा काही नारा आहे का? असं शेलार म्हणाले.

Tags:    

Similar News