औरंगाबाद: दिल्ली - हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होत होती. त्यानंतर मंगळवारी दानवे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाकिस्तान-चीनचा पाठिंबा असल्याचं वादग्रस्त विधान दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे देशभरातुन त्यांच्यावर टीका होत होती. तर अनेक ठिकाणी दानवे यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात आली. मात्र यावर दानवे यांनी मौन पाळले होते. मात्र मंगळवारी औरंगाबाद येथे दानवे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पत्रकारांनी पाकिस्तान-चीनचा शेतकरी आंदोलना सहभाग कसा,असा प्रश्न उपस्थित केला. यावर दानवे बोलताना म्हणाले की, "मी हाडाचा शेतकरी असून बनावट शेतकरी नाही. माझ्या वक्तव्याच्या विपर्यास करण्यात आला. त्यामुळे मीच काय कुणीही शेतकऱ्याची विटंबना करू शकत नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असेल तर माझा नाइलाज आहे," असे म्हणत दानवे यांनी पत्रकार परिषद मधून काढता पाय घेतला.