कालीचरण दास यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : अकोल्याच्या कालीचरणदास महाराज यांनी छत्तीसगडमधील रायपुर येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय धर्म संसदेत बोलताना महात्मा गांधीजींच्या विरोधात अपशब्द काढल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जातो आहे. तर राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. कालीचरणदास यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नवाब मलिक यांनी विधानसभेत केली.
कालीदास महाराज यांचा शिवतांडव स्तोत्र गाणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते रातोरात प्रसिध्द झाले. पण या कालीचरणदास महाराजाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे कालीचरण दास या फर्जी बाबावर गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. त्यांच्या या मागणीला काँग्रेस आणि भाजपनेही पाठिंबा दिला. पण यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यापेक्षा सरकारने गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल उपस्थित केला.