सांगली(Sangli) मधील विश्रामबाग येथे पोलिस मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी "केसेस आणि बदली कामा पुरतेच पोलीस ठाण्यात येऊ नका, पोलिसांना पाठबळ देण्यासाठी पण या", अशा शब्दात त्यांनी राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
याशिवाय "गेल्या काही वर्षांत राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे , बदली करण्याची भीती दाखवण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून केवळ समोरच्याचे समाधान होते, परंतु पोलिसांना त्यांचे काम करू द्या. पोलिसांचं मनोध्यर्य आपल्यालाच वाढवावे लागेल, राजकीय नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यावे लागेलं. गृहमंत्र्यांवर जर हे खाते संभाळताना मोठा ट्रेस असतो. तर मग फिल्डवर काम करणाऱ्या पोलिसांना किती ताण तणाव असू शकेल हे पण समजून घेणे गरजेचे आहे", असे देखील जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
याबद्दल बोलताना त्यांनी आर.आर पाटील यांची देखील आठवण काढली. "मी गृहमंत्री झाल्यानंतर आबांना या गृहखात्याबाबत विचारले होते. त्यांनी शुगर आणि बीपी हे आजार लावून घेणारे हे खाते आहे , असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे गृहखाते घेतल्यानंतर मला बीपीचा त्रास सुरू झाला. माझ्या पी.ए. ना शुगर आणि बीपीचा त्रास होऊ लागला. कामाच्या ताणामुळे मंत्र्यांना एवढा त्रास होत असेल तर पोलिसांना कामाचा ताण किती असेल हे लक्षात येते. तो दूर करण्यासाठी उपक्रम राबवा. त्यांना तीन - चार दिवस फिरण्यासाठी सुट्टी द्या", अश्या सूचना ही जयंत पाटील यांनी नेतेमंडळींना यावेळी दिल्या.