क्रूझवरील पार्टीच्या निमंत्रणाबाबत मंत्री असलम शेख यांचा खुलासा

Update: 2021-11-08 07:54 GMT

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCBने क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या पार्टीला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री असलम शेख यांनाही निमंत्रण होते, पण ते गेले नाहीत, अशी माहिती नवाब मलिक यांनी रविवारी दिली होती. त्यानंतर खळबळ उडाली असताना आता मंत्री असलम शेख यांनी आपल्याला या पार्टीचे निमंत्रण आले होते, पण आपण ते निमंत्रण स्वीकारले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यामागील कट समोर आला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अस्लम शेख यांनी या प्रकरणावरील आपले मौन सोडले आहे.

"या पार्टीचा आयोजक काशीफ खान याला आपण ओळखत नाही, पण त्याने एका कार्यक्रमात भेटून या पार्टीचे निमंत्रण दिले होते, पण मला जायचेच नसल्याने मी त्याचा फोन नंबर आणि इतर माहिती घेतलीच नव्हती" असे शेख यांनी स्पष्ट केले आहे. आपण मुंबईचे पालकमंत्री असल्याने आपल्या वेगवेगळ्या ठिकाणची निमंत्रणं येत असतात. आता यामागे कोणता कट होता का, याची चौकशी दोन यंत्रणा करत आहेत, त्यांनी सत्य समोर आणावे अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.

क्रुझला परवानगी देण्याचे काम राज्य सरकारचे नाही, तसेच आपल्या विभागाने किंवा राज्य सरकारने क्रुझला परवानगी दिली नव्हती. पण याचा अर्थ क्रुझ चालूच नयेत असे नाही, रुग्णाला नाही तर तो ज्या आजाराने ग्रस्त आहे त्या आजाराला संपवले पाहिजे, मुलांना नाही आरोपींना पकडले पाहिजे, २० हजार कोटींच्या ड्रग्जबद्दल कुणीच बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.

Tags:    

Similar News