1 एप्रिललाच रुजू व्हा,अन्यथा बडतर्फ, अनिल परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
एसटी कर्माचाऱ्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाही.त्याचपार्श्वभूमीवर एसटी कर्माचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुभा दिली होती. ती आज संपतेय.कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू करु,असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
आज दिवसाअखेर किती कर्मचारी कामावर हजर झाले,याची आकडेवारी माझ्याकडे येईल.जे कर्मचारी हजर झाले त्यांच्यावर कारवाई होणार नाही.तसेच बडतर्फ आणि सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलयं. उद्यापासून कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू करू, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.
आतापर्यंत सात वेळा मी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आणि त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचं आवाहन केलं. परंतु प्रशासन फक्त सांगतंय आणि करत काहीच नाही, असा एक समज झालाय. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरू करतोय. याशिवाय आम्ही ११ हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची नेमणूक करण्याचं आमचं टेंडर तयार आहे, त्यासंदर्भात आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ, असं अनिल परब यांनी सांगितलं.
जे कर्मचारी उद्यापासून कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू. वारंवार आवाहन करूनही ते कामावर हजर राहत नाहीत. कोर्टाने त्यांच्यावर कारवाई न करण्याबद्दल कोणतेही आदेश दिलेले नाही. कोर्टाने दिलेल्या निर्णयासंदर्भात आम्ही कॅबिनेटची मंजुरी घेतली आहे. ती मंजुरी घेतल्यानंतर आता आम्ही अॅफिडेविट कोर्टात सादर केली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.