शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार घरभेदी? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
गेल्या काही दिवसांपुर्वी एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली होती. त्यावर शिवसेनेने सडकून टीका केली होती. मात्र आता शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांचा मला खासदार करण्यासाठी सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून औरंगाबादमध्ये एमआयएमचा झेंडा फडकवणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या विजयात शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट जलील यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार इम्तियाज जलील हे वैजापुरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात बोलताना एकत्र आले होते. यावेळी बोलताना मला सत्तार यांनी लोकसभा निवडणूकीत मोठी मदत केली. तसेच माझ्या विजयात सत्तार यांचा मोठा वाटा असल्याचा गौप्यस्फोट जलील यांनी केला. तर पक्ष वेगवेगळे असले तरी इम्तियाज जलील यांच्याशू माझे मैत्रीचे नाते घट्ट असल्याचे सत्तार यांनी म्हटले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले की, सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर आहे. त्यामुळे राजकारणात त्यांची ज्यांच्यावर कृपादृष्टी होते. त्यांचे नशीब बदलून जाते. मात्र सत्तार एखाद्यावर नाराज झाले तर त्याचा वाईट काळ सुरू होतो, अशा शब्दात सत्तार यांचे कौतूक केले. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कट्टर शिवसैनिक चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला होता. तर सध्या अब्दुल सत्तार हे शिवसेनेत आहेत. मात्र त्यांच्यामुळे चंद्रकांत खैरेंचा पराभव झाल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतू या प्रकरणावर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया महत्वाची ठरणार आहे.
जलील यांना खासदार होण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या मदतीमुळे सत्तार हे शिवसेनेचे घरभेदी आहेत का? असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. त्यामुळे आगामी काळात या वक्तव्याचे राजकीय पडसाद कसे पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.