लोकशाही वाचविण्यासाठी इस्राईलचे लाखो नागरीक रस्त्यावर...
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आणलेल्या न्यायालयीन सुधारणा विधेयकाच्या विरोधात लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आणलेल्या न्यायालयीन सुधारणा विधेयकाच्या विरोधात लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या विधेयकामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचा आरोप करत हे विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी मोठा जनक्षोभ उसळला आहे. आंदोलकांनी इस्राईलच्या तेल अविवचे रस्ते बंद केले आहेत.
या विधेयकाला लाखो नागरिकांचा विरोध का ?
इस्राईल सरकारने आणलेल्या ओव्हरराईड विधेयकामुळे न्यायालयाचे आदेश बदलण्याचा अधिकार संसदेला मिळणार आहे. त्यामुळे ज्या सरकारचे संसदेत बहुमत आहे तो पक्ष न्यायालयाचे निर्णय देखील बदलू शकतो. यामुळे देशाची न्यायव्यवस्था आणि लोकशाही धोक्यात येऊ शकते असे येथील लाखो नागरिकांचे म्हणणे आहे.
सरकारचा न्यायाधीशांच्या नेमणुकीत हस्तक्षेप होत असल्याने न्यायालयाची निष्पक्षता कमी होउन त्यांच्या हक्कावर मर्यादा येतील. या विधेयकाच्या विरोधात सामान्य नागरीकांच्याबरोबरच प्रशासनातील महत्त्वाचे घटक असलेल्या पोलीस आणि व्यावसायिकांचा देखील मोठा विरोध आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात तेल अविव्हचे पोलीस प्रमुख एमिशाई अशेद हे देखील सहभागी झाले होते.
देशाच्या लष्करातही नाराजी.
या विधेयकावरून देशाच्या लष्करातही नाराजी असून याबाबत देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी या निर्णयावरून माघार घ्यावी अशी विनंती प्रधानमंत्र्यांना केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्र्यांना मंत्रिमंडळातूनच काढून टाकण्यात आले. या एकाधिकारशाही निर्णयामुळे जनतेतील असंतोष आणखी उफाळून आला आहे.