कोपरगावात उल्का सदृश्य वस्तू छत फोडून घरात...
कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात किरण ठाकरे यांच्या घरात मंगळवारी सकाळी उलका सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमकी ही वस्तू काय आहे. वाचा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट...;
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात राहणारे किरण ठाकरे यांच्या घरावर उल्का सदृश्य वस्तू पडल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी ठाकरे यांच्या घराचे छत फोडून ती वस्तू घरात येऊन पडल्याने ठाकरे कुटुंबात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही. मात्र घराच्या छताचा पत्रा तुटला असून ज्या ठिकाणी ही वस्तू पडली त्या ठिकाणी जमिनीवर खड्डा पडून घराचे नुकसान झाले आहे.
ही घटना घडण्याच्या वेळी सुरुवातीला जोरदार आवाज झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क नागरिकांमधून लावले गेले. मात्र नेमकी ही वस्तू काय आहे. हे कोणालाच कळेना कोणी म्हणत होते बॉम्ब सदृष्य वस्तू आहे. तर कोणीचा समज होता की, गॅस टाकी फुटली अशी चर्चा सुरू होती. दरम्यान घटनास्थळाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी हि उल्का सदृश्य वस्तू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून, या वस्तूचे नमुने तपासण्यासाठी पोलीसांनी ताब्यात घेतले असून, हे नमुने खगोलशास्त्र विभागाकडे तपासणी करिता पाठवण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.