अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक

Update: 2021-10-31 02:57 GMT

मुंबई// मध्य रेल्वे, मुंबई विभागाने आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे आज मुंबईकरांनी प्रवास करताना मेगाब्लॉग लक्षात घेऊन प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

या मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे आणि या सेवा विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

तर ठाणे येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे आणि या सेवा नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद असणार आहे.

पनवेल, बेलापूर,वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव,वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा देखील बंद राहणार आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

या मेगा ब्लॉक दरम्यान पनवेल अणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्‍चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.

Tags:    

Similar News