सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि खोटे आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतबाबत मॅक्स महाराष्ट्रने एक ठोस भूमिका घेतली आहे. कंगना राणावत यांनी शेतकरी दहशतवादी असल्याचे पुरावे सात दिवसांच्या आत द्यावेत आणि कंगना राणावत जोपर्यंत पुरावे देत नाही तोपर्यंत तिच्या कुठल्याही बातम्या @MaxMaharashtra पोर्टल वर देण्यात येणार नाहीत, अशी ठोस भूमिका मॅक्स महाऱाष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी घेतली आहे.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत. पण कंगनाने या शेतकऱ्यांना दहतवादी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहे. प्रसिद्ध पॉप सिंगर रिहाना हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केल्याने कंगना रानावतने ट्विट करुन आंदोलन कऱणारे शेतकरी नसून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत, असे तारे तोडले आहेत.
कधी महाराष्ट्रावर टीका करायची, कधी मुंबईची तुलना पाकशी करायची, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींवर आरोप करायचे पण याचे कोणतेही पुरावे कंगनाने आतापर्यंत सादर केलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत शेतकरी दहशतवादी आहेत हा आरोप सिद्ध करणारे पुरावे कंगना राणावत देत नाही तोपर्यंत तिच्या कोणत्याही बातम्या मॅक्स महाराष्ट्र दाखवणार नाही.