माथाडी कामगारांचा बेमुदत संप, कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष

Update: 2021-12-25 12:27 GMT

रायगड : खालापूर तालुक्यातील रसायनी भागातील मे.ए जे इ इंडिया प्रा. लि. (बिग कोला) या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या माथाडी कामगारांनी किमान वेतन, कामगारांच्या सोयी सुविधा आणि इतर मागण्यांसाठी कंपनीच्या गेटसमोर बेमुदत आंदोलन पुकारले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. तसेच या कंपनीत काम करीत असलेल्या महिलांनी गळ्यात मंगळसूत्र न घालणे, कपाळाला टिकली न लावणे अशा जाचक अटी कंपनी प्रशासनाने महिला कामगारांवर लादल्याचाही आरोप केला आहे. तसेच कायद्यानुसार या माथाडी कामगारांना वेतन न देणे, युनिफॉर्म, पायातील बूट आणि इतर लाभ देत नसल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.

पण कंपनीने यातील आरोप फेटाळत आपली बाजू स्पष्ट केली आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने बिग कोला कंपनीच्या एच आर व्यवस्थापक मीनल गडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कंपनीतील माथाडी कामगार यांनी काही मागण्या घेऊन संप सुरू केला आहे, त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने माथाडी बोर्डचे कमिशनर तसेच कंपनी व्यवस्थापन, अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, कामगार प्रतिनिधी यांच्यासमवेत दि: (23)डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कमिशनर कामानिमित्त बाहेर असल्याने बैठक होऊ शकली नाही, पुन्हा बैठकीचे आयोजन होईल त्यानंतर चर्चेअंती तोडगा काढला जाईल. याचबरोबर महिलांच्या संदर्भात आंदोलकांनी केलेले आरोप कंपनी व्यवस्थापक मीनल गडगे यांनी फेटाळून लावले आहेत. माथाडी कामगारांच्या वेतनवाढीसाठी 2018 पासून माथाडी बोर्डात प्रस्ताव मांडले होते, कारण कंपनी माथाडी बोर्डात पगार करते, मात्र माथाडी कामगार यांच्या मागण्या अधिक असल्याने कामगार तो प्रस्ताव मान्य करीत नव्हते. अजूनही यासंदर्भात बैठका सुरू आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Full View

Tags:    

Similar News