आमदार निलेश लंकेंनी कोरोनाचे नियम बसवले धाब्यावर, कोविड सेंटरमध्ये विवाह सोहळा
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने एक कोविड केअर सेंटर सुरु केलं. या कोव्हिड सेंटर ची राज्यातच नाही तर देशात चर्चा आहे. मात्र, या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत आहेत. स्वत: मास्क न घालता ते या कोव्हिड सेंटरमधून फिरताना पाहायला मिळायचे. त्यांनी कोरोना रुग्णांसोबत काढलेले सेल्फी देखील व्हायरल झाले होते. मात्र, आता त्यांनी या कोरोना सेंटरमध्ये लग्न लावून दिल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
गेल्या एक ते दीड वर्षात अनेक चांगल्या लोकप्रतिनिधींचा कोरोनामुळं जीव गेला आहे. खासदार राजीव सातव, आमदार भारत नाना भालके यासारखे लोकप्रिय आणि समाजाच्या हितासाठी धाऊन जाणारे लोकप्रतिनिधी कोरोनाने हिरावून घेतले. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या उक्ती प्रमाणे आमदार निलेश लंके यांचं कार्य मोठं आहे. त्यांच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्यावर हजारो लोकांची जबाबदारी आहे. त्यामुळं त्यांनी लोकांच्या काळजी घेताना स्वत:ची काळजी देखील घेतली पाहिजे.
मात्र, याच काळात निलेश लंके यांनी या कोव्हिड सेंटरवर विवाह सोहळे भरवण्याची परवानगी दिल्यानं चिंता वाढली आहे. कोव्हिड सेंटरवर कोरोना रुग्ण असताना या ठिकाणी 2 विवाह समारंभ पार पडले आहेत. या विवाह सोहळ्यातील लोकांना कोरोना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारे कोरोना सेंटरवर विवाह सोहळे झाले तर कोरोनाची तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे या विवाह सोहळ्याला जिल्हाअधिकाऱ्यांनी परवानगी कशी दिली? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क केला असता, या संदर्भात मी माहिती घेऊन उत्तर देतो असं त्यांनी सांगितलं आहे.
या संदर्भात आम्ही निलेश लंके यांच्याशी देखील संपर्क साधला असता, त्यांनी ही नवरदेवाची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. त्यातील एक मुलगा कोव्हिड सेंटरमध्ये काम करतो. असं सांगितलं. लग्न समारंभ करताना सर्व नियमांचं पालन करण्यात आल्याचं यावेळी आमदार निलेश लंके यांनी म्हटलं असलं तरी लंके यांच्या तोंडाला मास्क नसल्याचं दिसून येत आहे. या संपुर्ण विवाह सोहळ्याची चित्रफीत पाहिली असता, अनेक लोकांच्या तोंडाला मास्क नसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान या सोहळ्याच्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
उद्या नवरदेवाची इच्छा कोरोना सेंटर ऐवजी कोरोना आयसीयू सेंटरमध्ये लग्न करण्याची झाली तर अशा प्रकारे परवानगी दिली जाऊ शकते का?
या लग्न सोहळ्यात आलेल्या नातेवाईकांना प्रशासनाने क्वारंटाइन केलं आहे का?
कोरोना सेंटरमध्ये विवाह सोहळा होत असताना प्रशासनाला अद्यापपर्यंत या गोष्टीची माहिती का मिळाली नाही.
अशा प्रकारे पुन्हा कोव्हिड सेंटरमध्ये विवाह सोहळे होऊ नये म्हणून सदर व्यक्ती वर शासन काय कारवाई करणार? असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात..