मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना

राज्यात कोरोनाचे संकट कायम असताना आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार आणि कोण जिंकणार अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.;

Update: 2020-11-02 14:17 GMT

औरंगाबाद: कोरोनामुळे लांबलेल्या राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 1 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. तर महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

सतीश चव्हाण हे गेल्या बारा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तसेच आता पुन्हा राष्ट्रवादीतर्फे चव्हाण यांना उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चव्हाण यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. तर भाजपकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

भाजपला या मतदारसंघात सलग दोनवेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपकडून गेल्यावेळी पराभव झालेले शिरीष बोराळकर पुन्हा नशीब अजमवण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे. मात्र भाजपकडूनच प्रवीण घुगे आणि किशोर शितोळे हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी कुणाला निश्चित होणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे.

या निवडणुकीसाठी अधिसूचना ५ नोव्हेंबर रोजी जारी होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर असणार आहे. तसेच 1 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Tags:    

Similar News