भावनांना तर्काच्या खुंटीचा आधार हवा - डॉ. सुधीर पानसे

Update: 2024-02-29 03:05 GMT

२८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'विज्ञान कविता' कार्यक्रम माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या ठिकाणी पार पडला. 

"गणिताचे सामर्थ्य सूत्रामध्ये आहे तर कवितेचे सामर्थ्य शब्दरचनेमध्ये आहे. अक्षर शब्दांची ताकद विस्फारते. अनेक वैज्ञानिक कविताही करत होते हे ऐकून आश्चर्य वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे". राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या 'विज्ञान कविता' या कार्यक्रमात डॉ. सुधीर पानसे बोलत होते.

 

"केवळ वैज्ञानिक संज्ञा किंवा कल्पना वापरून केलेली कविता वैज्ञानिक कविता नसते तर जिचा आत्मा विज्ञान तंत्रज्ञान यासह मानवी जीवनाशी जोडलेला असतो ती विज्ञान कविता." डॉ. पानसे यांनी सांगितले की - मराठीतील पहिली विज्ञान कविता म्हटलं तर बहिणाबाई चौधरी यांची 'नानाजीचा छापखाना' म्हणता येईल. याच जळगावच्या नानाजींच्या छापखान्यात त्यांनी केशवसुतांच्या कविता प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात केशवसुत आर्किमिडीज प्रमाणे म्हणतात - “काव्य पंक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे; टेकुनी ती जनता शीर्षावरी | जगत उलथुनिया देऊ कसे" वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून जग बदलू असा दृढ विश्वास कवी दाखवतात.

मराठीत १९५० च्या सुमारास 'यंत्रावतार' ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिली. यंत्रांच्या वापराने भौतिक प्रश्न सुटणार अशी आशा कवीला वाटते. 'यात्रा' या कवितेतून मानवी प्रेम आणि संयमी विज्ञानाची वाटचाल पानसे यांनी दाखवली.

'असेल असेल ' या स्वरचित कवितेतून डॉ. पानसे यांनी पुराणातील विज्ञानाचा वृथा अभिमान बाळगणाऱ्यांना उघडे पाडले. तामिळ कवी वीर मुथ्थु यांची 'हॅलो २०००' तसेच उडिया कवी जगन्नाथ प्रसाद दास यांची 'हिरोशिमा नंतर ४० वर्षांनी' या कविता सादर केल्या.

जागतिक तापमानवाढीला कारण ठरणारा 'हव्यास' त्याच नावाच्या कवितेचे वाचन करताना - ही धरती प्रत्येकाची गरज भागवू शकते पण कोणा एकाची हाव नाही - या म. गांधींच्या सुप्रसिद्ध वचनाची आठवण डॉ. पानसे यांनी करून दिली.

अरुण काळे या दलीत कवीची - तू मदर बोर्ड माझ्या संगणकाचा - ही कविता संगणकीय शब्दांच्या वापरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा आढावा घेते. 'महात्मा' या कवितेतून १९३० ते १९४० या काळात चाललेल्या दोन शोधांची दखल डॉ. पानसे यांनी घेतली. त्यातला एक शोध आहे थोडेसे युरेनियम वापरून अणुऊर्जेतून विध्वंसक अणुबॉम्ब बनवण्याचा तर दुसरा शोध दांडी यात्रेतून मुठभर मीठ उचलून सर्वसामान्यांना अहिंसक सत्याग्रहातून अन्यायाविरुद्ध उठण्याचे आत्मबल मिळू देणारा. पुढे जगभर अणुबॉम्ब बनविणारे हिंसेच्या भयाने आशंकीत झाले आणि अहिंसक मार्गाने चालणारे - जिंको वा हारो निर्भय राहिले.

विश्वरूप दर्शन - कृष्णाने अर्जुनाला दाखवलेले विश्वरूप दर्शन हा प्रतिभेचा आविष्कार आहे तो पाहून अर्जुन भावूक होऊन बावरून जातो, विश्वरूप दर्शन थांबव म्हणतो. तर आज खगोलशास्त्राच्या अभ्यासात ताऱ्यांनाही जन्म, वाढ आणि अंत आहे याचे दर्शन बुद्धीगम्य पद्धतीने होते. यांच्या अभ्यासासाठी नव्या दमाचे तरूण पुढे येतात उत्सुकतेने विश्वदर्शन अभ्यासतात. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतात.

तर्काच्या खुंटीवरून भावना निसटल्या तर त्या माणसामाणसात, समाजासमाजात दुरावा निर्माण करतात असे सांगून आपल्या भाषणाच्या अखेरीस डॉ. सुधीर पानसे यांनी - बा. सी. मर्ढेकर यांच्या - जाऊ दे कार्पण्य ‘मी’ चे, दे धरु सर्वांस पोटी,

भावनेला येऊ देगा, शास्त्रकाट्याची कसोटी ! - या चपखल ओळींनी आपल्या - विज्ञान कविता - या भाषणाचा शेवट केला.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे उपाध्यक्ष विनय र. र. म्हणाले की समाजात वैज्ञानिक मनोवृत्ती वाढायला हवी असेल तर भाषा विकसित करायला हवी तसेच मराठीत विज्ञान कथा, कविता, विनोद, चुटके असे भाषिक साहित्यही निर्माण व्हायला हवे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सराफ होते. यावेळी शशी भाटे, विद्याधर बोरकर, सुधीर नारखेडे, प्रज्ञा देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



Tags:    

Similar News