मराठा आरक्षण: खासदार संभाजीराजे भोसले यांना संसदेत प्रश्न मांडता येईना...

मराठा आरक्षण: खासदार संभाजीराजे भोसले यांना संसदेत प्रश्न मांडता येईना... काय आहे कारण? वाचा;

Update: 2021-08-05 10:28 GMT

सध्या दिल्ली येथे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात पेगासस हेरगिरिचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. विरोधकांच्या या गदारोळामुळे अनेक विधेयक याच गदारोळात मंजूर केली जात आहे.

देशात मोदी सरकारने पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार विरोधी पक्षाचे नेते, विद्यमान मंत्री यांची हेरगीरी केल्याचा आरोप विरोधक करत आहे. या पेगासस हेरगिरीची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, मोदी सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे संसदेत गदारोळ कायम आहे.

या गदारोळाचा फटका खासदारांना बसला आहे. खासदार संभाजी भोसले यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना संसदेत मांडायचा होता. मात्र, या गदारोळामुळे मांडता आला नाही. असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.

काय म्हटलंय संभाजी राजे यांनी?

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सभापतींनी तीन वेळा प्रश्न मांडण्यासाठी वेळ देखील दिला. मात्र सत्ताधारी व विरोधी पक्षात काही विषयांवर असमन्वय असल्याने त्याचे पडसाद सभागृहात उमटून वारंवार कामकाज स्थगित होत आहे.

यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही संसदेत मांडता आला नाही. इतरही अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांचा ज्यावर आक्षेप आहे, त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी सामंजस्याने एकत्र बसून विषय सोडवावेत. मात्र त्याकरिता संसदेच्या कामकाजात बाधा आणू नये.

Tags:    

Similar News