अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं ठाकरे सरकारबाबत मोठं विधान....
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. अशा परिस्थितीत कोल्हापूरमध्ये तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. या दौऱ्या दरम्यान अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची नवीन राजवाडा येथे भेट घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतली असताना अजित पवार यांनी घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि शाहू महाराज यांच्या भेटीनंतर सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं वक्तव्य शाहू महाराजांनी केलं आहे.
काय म्हटलंय शाहू महाराजांनी....
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे, त्याचं मराठीत भाषांतर करुन समजून घेतला पाहिजे. तसंच न्यायालयाचा अवमान होता कामा नये. याची काळजी घेण्याचं आवाहन यावेळी शाहू महाराजांनी समाजाला केलं आहे.
केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची....
केंद्र सरकारने जर येथे लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितलं पाहिजे. कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही. असं म्हणत मराठा आरक्षणात केंद्र सरकारच्या भूमिकेकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
ठाकरे सरकार सकारात्मक...
मराठ्यांसाठी जास्तीत करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
आंदोलनाबाबत चर्चा नाही...
मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. दरम्यान या भेटीवर अजित पवार यांनी अद्यापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.