धमकी आल्याचे सांगणे म्हणजे केवळ स्टंटबाजी ; एकनाथ शिंदे यांच्यावर माओवादी प्रवक्त्याची आगपाखड

Update: 2021-11-11 02:48 GMT

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगणे म्हणजे दुसरी स्टंटबाजी आहे, असं भाकपाच्या पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने म्हटले आहे. तसं पत्रकच भाकपाने जारी केलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र नेमके कुठून आले याचा तपास अजून सुरूच असल्याची माहिती आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील खाणींविरोधातील आंदोलन या विषयाला धरून प्रवक्ता श्रीनिवास याने काढलेल्या पत्रकात सत्तापक्षातील मंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली आहे. खाणींविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यावरून वडेट्टीवार यांच्यावर श्रीनिवासने आगपाखड केली तर लोहप्रकल्प उभारण्यावर ठाम असण्यावरून शिंदे यांना त्याने लक्ष्य केले. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातच लोहखाणीची लीज देण्यात आली. भाजप-शिवसेनेच्या सरकारने अन्य कंपन्यांना लीज वाटप केली. त्यामुळे वडेट्टीवार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सुरजागड खाण खोदण्याच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते. तर सत्ता आणि कायदा यांच्या हातात असताना सुरजागड खाण बंद करण्याचा आदेश का देत नाही? असा सवाल प्रवक्ता श्रीनिवासने पत्रकातून केला आहे.

तर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. नक्षवाद्यांकडून ही धमकी मिळाली असे सांगण्यात आले होते. मात्र, या धमकीला झुगारून त्यांनी शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलीस ठाण्याला भेट दिली होती. इतकंच नाही तर तिथल्या पोलीस जवानांच्या सोबत दिवाळीचा सणही शिंदे यांनी साजरा केला.

Tags:    

Similar News