अतिवृष्टीमुळे मेळघाटातील अनेक गावांचा तुटला संपर्क
अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अतिवृष्टीमुळे मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पुर्णा प्रकल्पाचे 9 दरवाजे 20 सेमीने उघडण्यात आलेत.;
अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील शेती मशागतीच्या कामांवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध असलेल्या मेळघाटातील लहान-मोठ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. मेळघाटातील अनेक पूल हे ब्रिटिश कालीन असून ते कमी उंचीचे असल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहत आहेत. यामुळे जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ज्या पुलावरून दोन चाकी किंवा चारचाकीने पूल ओलांडणे शक्य नाही अशा ठिकाणी नागरिक शेतात व इतर कामांकरिता जाण्यासाठी थेट ट्रॅक्टर व ट्रॉलीचा वापर करत आहेत अशा प्रकारे होणारी वाहतूक ही धोकादायक असून पाऊस असताना फुल ओलांडून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
पुर्णा प्रकल्पाचे 9 दरवाजे 20 सेमीने उघडले
विदर्भात बुधवार पासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यात असलेला मध्यमपूर्णा प्रकल्प 59.32 % भरला आहे. त्यामुळे पूर्णा प्रकल्पाचे 9 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत. यातून 20.98 घ.मी.से.ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग 122.14 घनमीटर प्रति सेकंदाने सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.