महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, ठाकरे सरकारला भाजपचा इशारा
राज्य मंत्रीमंडळाने किराणा दुकानात मद्य विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.;
राज्य सरकारने किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, पेट्रोल डिझेल ऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी उठवून दारू विक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय आणि आता त्यापाठोपाठ थेट सुपर मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानातून दारूची विक्री करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यावरून संताप व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
पुढे फडणवीस म्हणाले की, दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडात गरीब, शेतकरी-कष्टकरी, बारा बलुतेदार यांपैकी एकाही घटकाला राज्य सरकारने मदत केली नाही. तर सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच आहे, असा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला. तर महाविकास आघाडीचे सरकार नेमके आहे तरी कोणाचे असा सवाल फडणवीस यांनी ट्वीटमधून विचारला आहे. याबरोबरच सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या फडणवीस सरकारने गरीबांना थोडी तरी मदत करावी, असे मत व्यक्त केले आहे.
राज्य सरकारने दारूबाबत घेतलेले निर्णय-
• ऐन कोरोना काळात राज्यात कडक लॉकडाऊन असताना राज्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आली होती.
• फडणवीस सरकारच्या काळात चंद्रपुर जिल्ह्यातील नागरीकांनी केलेल्या मागणीमुळे चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने दारूबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने दारू विक्री केली जाते. त्यामुळे सरकारचा कर बुडतो असा दावा करत दारूबंदी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
• महाविकास आघाडी सरकारने विदेशी मद्यावरील आयात कर 300 टक्क्यावरून 150 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
• आता राज्यात किराणामालाचे दुकान आणि सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीची परवानगी मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिली आहे.