बीडच्या माजलगाव शहरालगत असणार धरण शंभर टक्के भरले असून आज पहाटे 4 वाजल्यापासून धरणाचे तब्बल 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले असून 77 हजार 300 क्युसेस वेगाने सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील सिंदफणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं अगोदरचं सिंदफणा नदीला कालपासून पुरस्थिती आहे. त्यातच धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक गावातील पूल पाण्याखाली गेले आहे. हजारो हेक्टर पीकं उध्वस्त झाले आहेत. तर आता माजलगाव तालुक्यात धरणाखाली असणाऱ्या, अंधापुरी, रोशनपुरी, मनूर, गोविंदपूर, सांडस चिंचोली, ढेपेगाव, मंजरथ या गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे संबंधित ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून धरणाच्या लाभ क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यातच हवामान विभागाकडून पुढील 48 तासात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालेले पाहायला मिळत आहे.बीड