दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेवर सिनेमा काढण्याची घोषणा केली आहे. यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर टीका होते आहे. महेश मांजरेकर यांनी असा सिनेमा बनवू नये अशी मागणी आरपीआयच्या खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने नागरिकाला बोलण्याचे आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु कोणालीही चोरीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले नाही आणि दुर्जन माणसाचे उदात्तीकरण करण्याचेही स्वातंत्र्य तर दिलेले नाही. एकीकडे रावण आणि दुर्योधनाला नावे ठेवता आणि दुसरीकडे नथुराम गोडसेवर फिल्म काढून भारताच्या जनतेपुढे कोणता आदर्श ठेवत आहात?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. यामुळे नथुराम गोडसे यांच्यावर चित्रपट काढू नये अशी मागणी करत असल्याचे खरात यांनी म्हटले आहे.