मागील काही दिवसांपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेती-शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, महाविकास आघाडी सरकार नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत देणार असल्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ते नाशिकच्या नांदगांव येथे नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुरपरिस्थितीला वाळू माफिया जबाबदार असून सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री पाटील म्हणाले की, वाळू माफियांची वाढ ही मागील सरकारच्या काळातच झाली, आमचं सरकार एन.जी.टी.कायदा सक्त अंमलात आणायचं काम करत आहे. गेल्या पाच सात वर्षाचा हा परिणाम असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँगेस पक्षाने आयोजित परिवार संवाद दौऱ्यासाठी नाशिक येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले आहे.