#MaharashtraBandh : लखीमपूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद.. दुकानं, बाजार समित्या बंद
लखीमपूरमध्ये बेदरकारपणे गाडी चालवून शेतकऱ्यांना ठार केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदला राज्यभरात रात्रीपासून सुरूवात झाली आहे. राज्यातील शेतकरी संघटना, तसेच अनेक व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्याने सकाळपासून अनेक व्यापारी आस्थापना बंद आहेत. पुण्यातील व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा देत आज दुकाने बंद ठेवली आहेत. मुंबईतही बहुतेक ठिकाणी दुकानं उघडण्यात आलेली नाहीत. रस्त्यांवर बसेसची वाहतूकही कमी प्रमाणात आहे. खासगी गाड्यांनी लोक प्रवास करत आहे. दरम्यान रविवारी रात्री अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांना भेटून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
राज्यातील सगळ्यात मोठे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही आज पूर्णपणे बंद आहे. वाशी येथील भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. या मार्केटमध्ये रोज 700 ते 800 गाड्यांची आवक असते. मात्र मध्यरात्रीपासून एकही गाडी आलेली किंवा गेलेली नाही. त्यामुळे रोज लाखो रुपयांची होणारी उलाढाल आणि रोज गजबजलेले मार्केट आज पूर्णपणे ठप्प आहे. मार्केटमधील कामगारांचा आणि व्यापारांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. काही व्यापारी आणि कामगारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा त्यांनी लखीमपुर घटनेचा निषेध केला असून,आमचा या बंदला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असे सांगून आमचा उदरनिर्वाह शेतकऱ्यांवरच अवलंबून आहे. त्यामुळे एका दिवसाच्या बंदने आम्हाला काहीही फरक पडणार नाही, आम्ही राज्य सरकारच्या महाराष्ट्र बंदला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे सांगितले.