मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे.
दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकाने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीसाठी प्रताप सरनाईक यांना वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. ईडीच्या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने प्रताप सरनाईक यांची बाजू घेत दिलासा दिला आहे.
विशेष म्हणजे, प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांनी मंगळवारी संध्याकाळी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी सरनाईक यांनी ईडीकडून होणाऱ्या चौकशीबाबतही आक्रमक भाष्य केलं होतं. 'ही लढाई एकट्या प्रताप सरनाईकची नाही. ही लढाई संपूर्ण महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मला पाठिंबा असल्याचा विश्वास दिला आहे,' असं प्रताप सरनाईक म्हणाले.
'माझ्यावर आरोपपत्र दाखल झालेलं नाही. एका फिर्यादीने माझं नाव घेतल्याने मला ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. मी पळून जाणारा नाही. ईडीकडून जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल, तेव्हा मी नक्की जाणार आहे. मी काहीही गुन्हा केलेला नाही. मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे आज मी उभा आहे,' असं म्हणत सरनाईक यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.
काय आरोप करण्यात आले होते?
1) MMRDA सुरक्षा रक्षक कंत्राटा मधील 30 टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50 टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा हा 50 टक्के हिस्सा प्रताप सरनाईकांचा आहे. असं टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे मालक राहुल नंदा यांनी सांगितले होते.
2) मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे MMRDA चे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते ज्यातकरता महिला 32 ते 33 लाख रुपये MMRDA देणार होती हे कंत्राट 50-50 टक्के प्रॉफिट शेअरनुसार टॉप्स ग्रुप आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलं होतं. हा प्रताप सरनाईकांचा 50 टक्के शेअर टॉप्स ग्रुपकडून प्रताप सरनाईक यांच्या करता अमित चंडोळे रोख रक्कमेत स्विकारायचा.
3) अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना 6 लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून 6 लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली.
4) उद्योगपती राहुल नंदा यांची आणि अमित चंडोळेची भेट प्रताप सरनाईक यांनी घडवून आणली होती.
5) MMRDA आणि टॉप्स ग्रुपमध्ये जे व्यवहार व्हायचे त्या व्यवहारातील 50 टक्के रक्कम ही राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलेल्या करारानुसार, अटी शर्ती पलिकडे जाऊन दिली जायची. ती ही रक्कम रोख स्वरुपात किंवा इंटरनेट बॅंकिंग स्वरुपात दिली जायची.
6) MMRDA चे सुरक्षा रक्षकांचे टेंडर निघण्यापूर्वी 50 टक्के नफा या टेंडरमधून प्रताप सरनाईकांना दिला जाईल, असे सगळे व्यवहार तोंडी स्वरुपात एकमेकांशी झाले होते.