महाराष्ट्राच्या ऑक्सिजनमध्ये केंद्राची कपात, राष्ट्रवादीचा गंभीर इशारा

Update: 2021-05-12 03:20 GMT

कर्नाटकातील बेल्लारी येथून महाराष्ट्राला देण्यात येणार्‍या ऑक्सिजन कोट्यात कपात केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना मलिक यांनी केंद्र महाराष्ट्राच्या कोट्यातील ऑक्सिजन कपात करुन महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं करत असल्याचा आरोप केला आहे.

राज्यासाठी कोटा निश्चित करण्यात आला असताना आता केंद्राकडून ५० टन कपात करण्यात आली आहे. याचा वापर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये करता येत होता. मात्र केंद्राची ही भूमिका अन्यायकारक आहे. ५० टन कपात केली तर कोल्हापूरमधून ११ ते १२ टन गोव्याला द्यायला सांगत आहेत. १२०० टन सरकारचे आणि ३०० टन अतिरिक्त केंद्रसरकार देते. मात्र, आता बेल्लारी येथून कपात केली जाणार आहे. केंद्राने ही कपात करून अन्याय करु नये. लोकांच्या औषधोपचाराची जबाबदारी केंद्राची आहे.

कर्नाटक आणि गोव्यात भाजपचे सरकार असल्याने तिथे जास्त लक्ष देणे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणे योग्य नाही. आमच्या गरजा असताना भाजपशासित राज्यात नेण्याची भूमिका केंद्राची योग्य नाही. त्यामुळेच देशाची एकच नीती असली पाहिजे आणि ऑक्सिजनच्याबाबतीतही तीच नीती राबवावी. अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लसीकरण फक्त स्थानिक लोकांना आधारकार्डवर देण्याची घोषणा केली आहे. मात्र, कामानिमित्त त्यांची लोकं देशभर पसरली आहेत. मग इतर राज्यांनी आम्हीही लस देणार नाही अशी भूमिका घेतली तर ही माणुसकी राहिल का? असे सांगतानाच या निर्णयामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या या निर्णयावर आणि लसीबाबत केंद्रसरकार काय निर्णय घेणार आहे अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

Tags:    

Similar News