महाराष्ट्र ओमिक्रॉनचा Hotspot ; देशात omicron बधितांची संख्या 88 वर
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन देशात झपाट्यानं पसरत आहे. आतापर्यंत राज्यांत ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 32 वर पोहचली आहे.त्यामुळे महाराष्ट्र हे ओमिक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं दिसून येत आहे;
नवी दिल्ली// कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन देशात झपाट्यानं पसरत आहे. आतापर्यंत 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आलेत. मागील काही तासात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी 4 रुग्ण , तेलंगणामध्ये 2 , पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे, ज्यामुळे देशातील ओमिक्रॉन बधितांची संख्या 88 वर पोहोचली आहे.
राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात 32, राजस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, केरळमध्ये 5, गुजरातमध्ये 5, तर आंध्र प्रदेश, चंदीगड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
या आकडेवारीवरून महाराष्ट्र हे ओमिक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमिक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.
मुंबईत न्यू ईयर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 16 ते 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात 50 टक्के क्षमतेनुसार लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतही न्यू ईयर आणि ख्रिसमसमुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याच्या भीतीने 31 डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फक्त 50 टक्के लोकांना बार आणि रेस्टॉरंटमध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अनेक राज्ये ओमिक्रॉनबाबत सतर्क असून त्यांनी नवी नियमावली जारी केली आहे. केंद्र सरकारनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, केंद्रानं सर्व राज्यांना ऑक्सिजन प्लांट्स पूर्णपणे कार्यरत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्याचा सल्ला दिला आहे.