महाराष्ट्र सरकार देणार राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार...

Update: 2021-08-12 02:21 GMT

Photo courtesy : social media

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे एक घोषणा करत देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचं नाव बदललं. पूर्वी या पुरस्कारचं नाव "राजीव गांधी खेलरत्न" पुरस्कार असं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेनंतर आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. मात्र, या घोषणेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर केला आहे.

महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आता राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने केलेल्या या घोषणेनंतर भाजपने त्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. आयटी क्षेत्रात समाजासाठी काम करणाऱ्या सर्वोच्च संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने एक पुरस्कार देण्यात येईल. यामुळे या क्षेत्रात समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना सन्मान मिळेल.

सोबतच राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात. 'महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून, मला हे सांगताना अभिमान वाटतो की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्वर्गीय श्री राजीव गांधीजी यांच्या नावाने 20 ऑगस्ट 2021 रोजी एक पुरस्कार जाहीर करणार आहे... ज्याचा उद्देश आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या शीर्ष संस्थांना प्रोत्साहित करणे हा आहे'.

दरम्यान सतेज पाटील म्हणतात की, हा पुरस्कार राजीव गांधी यांचा सन्मान करण्यासाठी आहे. राजीव गांधी 1984 ते 1989 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. तसंच त्यांनी भारतातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे हा पुरस्कार राजीव गांधी यांना भारतातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रेसर कार्यासाठी कायमस्वरूपी श्रद्धांजली ठरेल.

यासोबतच, इतर काँग्रेस नेतेही महाराष्ट्र सरकारने उचललेल्या या धाडसी पावलाचे कौतुक करत आहेत.

महाराष्ट्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करणं. ही अभिमानाची बाब आहे. मी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने अशा पुरस्काराबाबत चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर 20 ऑगस्ट 2021 रोजी प्रथमच हा पुरस्कार दिला जाणार आहे.

भाजपचा विरोध...

दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या या घोषणेननंतर मात्र, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र भाजपचे आमदार राम कदम म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात त्यांना हरकत नाही, परंतु पुरस्काराची घोषणा अशा वेळी करण्यात आली. जेव्हा राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून बदलण्यात आले.

भाजप आमदार राम कदम म्हणतात की, शिवसेनेला मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल आनंद झालेला नाही. हे शिवसेनेचे दुटप्पी राजकारण आहे. दरम्यान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा 1991 मध्ये सुरु झाला. देशातील पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता. आत्तापर्यंत एकूण 43 खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाव बदलण्याच्या राजकारणात गुजरातमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्यांनतर सुद्धा बराच गदारोळ पाहायला मिळाला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसने भाजपला चांगलेच फटकारले होते.

Tags:    

Similar News