मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं, तपास अखेर ATSकडे, गाडी मालकाचासंशयास्पद मृत्यू
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास आता ATSकडे देण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. शुक्रवारी या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. ज्या व्यक्तीची गाडी चोरली गेली होती त्या ठाण्याच्या मनसुख हिरेन या व्यक्तीचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत आढळला आहे. याच मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या संबंधांची माहिती देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिरेन यांच्या चौकशीची मागणी केली होती. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित होऊन दोन तास होत नाही तोच हिरेन यांचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. हिरेन यांची आत्महत्या आहे की हत्या असा संशय व्यक्त करत विरोधकांनी सरकारला या प्रकरणाची चौकशी NIAकडे देण्याची मागणी केली होती. यानंतर अखेर सरकारने तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय आरोप केले होते?
याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या सचिन वझे यांच्याकडून तपास काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे का दिला गेला असा सवालही त्यांनी विचारला आहे. ज्या व्यक्तीची गाडी चोरुन त्यात स्फोटकं ठेवली गेली होती, ते मनसुख हिरेन ठाण्यात राहत आहेत. तसेच ती व्यक्ती सचिन वझे यांच्या संपर्कात गेल्या काही महिन्यांपासून होती, हे त्यांच्या फोन कॉलवरुन दिसते, असा दावा फडणवीस यांनी केला. तसेच गाडी सापडली तेव्हा सगळ्यात आधी तिथे सचिन वझेच कसे पोहोचले, त्यांनाच धमकीची चिठ्ठी कशी मिळाली असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.
जैश उल हिंदच्या नावाने एक पत्र दाखवून खंडणी मागण्याकरीता हा प्रकार केला गेल्याचे दाखवले जाते आहे का, त्यामुळे हे दहशतवादी कृत्य असल्याचे दिसत असल्याने याची चौकशी NIAकडे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. पण अखेर सरकारने हा तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.