कोरोनामुळे राज्यातील हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्तराँ घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासा देताना सरकारने वेळ वाढवून दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश देण्याची अट घालण्यात आली आहे. पण प्रार्थना स्थळं आणि थिएटर मात्र बंदच राहणार आहेत. आरोग्य मंत्रालयातर्फे मुख्यमंत्र्यांना निर्बंध कमी कऱण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. १५ ऑगस्टपासून लोकल मध्येही लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आली आहे. पण दुसऱ्या डोसनंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. प्रवाशांनी स्वतःचं ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवले तर प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पासेस देण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.
हॉटेल्सना ५० टक्क्यांपर्यंत ग्राहकांची मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या जागेत किंवा लॉनमध्ये होणाऱ्या विवाहांना जास्तीत जास्त २०० लोकांची परवानगी देण्यात आली आहे. हॉलमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे किंवा १०० या पेक्षा जास्त नाही.
खासगी औद्योगिक कार्यालयामधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयं २४ तास सुरू राहू शकतील, असाही निर्णय घेण्यात आला आहे. सर्व दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. पण सिनेमा थिएटर आणि मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे.