राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिकस्थळे, सिनेमागृहे, मल्टीप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून हे आदेश लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील असे आरोग्य विभागाने प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.