पूरग्रस्तांचे अन्न पाण्यावाचून हाल !
महाड येथे पुरबाधितांसाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर मदतकार्य सुरू असलं , तरी प्रशासनाला प्रत्येक ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब होत असल्याने पूर बाधितांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत
अतिवृष्टी व महापुराच्या संकटात सापडलेल्या महाड करांचे दुःख व वेदना काही केल्या कमी होतांना दिसत नाहीत. मुसळधार पावसामुळे महाडमध्ये सर्वत्र हाहाकार उडाला आहे. कुठे घरात पुराचे पाणी शिरलं आहे. तर कुठे संपुर्ण गावावर चिखलाचं साम्राज्य आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. पूर बाधितांसाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर मदतकार्य सुरू असलं तरी प्रशासनाला प्रत्येक ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब होत असल्याने पूर बाधितांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. पुराने संसार उध्वस्त झालेल्या महाडकरांच्या नजरा लागल्या आहेत त्या मदतीकडे.
पुरामुळे महाडमध्ये सर्वत्र चिलमय परिस्थिती आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रमाणात पूर ओसरला असला तरी , महाडकरांचे डोळे मात्र ओलेच आहे.