शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना का वाढतोय? मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात का वाढतोय कोरोना?;

Update: 2021-02-08 14:32 GMT

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. पथकाने विदर्भातील चार जिल्ह्यांबाबत नोंदविलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर व अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीत दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय पथकातील सदस्य तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास याावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र शहरी भागापेक्षा नंदूरबार आणि भंडारा सारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे? याचा गांभिर्याने विचार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी करण्यात येईल

आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले, पथकाने ज्या भागातील पॉझीव्हीटी दर जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे त्याची दखल घेऊन तेथील हा दर कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करू. याभागातील रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील.

टास्क फोर्सच्या माध्यमातून डॉक्टरांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात यावे त्याचबरोबर डेथ ऑडीट कमिटीचे कार्यही प्रभावीपणे करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

देशात असलेल्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये ४० टक्के तर महाराष्ट्रात २४ टक्के रुग्ण आहेत.

त्याबाबत आढावा घेण्यासाठी एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचे पथक शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पीटल तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर येथे भेटी दिल्या.

राज्यातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या असून याभागातील नविन रुग्णांची संख्या घटत असल्याचे पथकाने सांगितले.

विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात पॉझीटिव्हीटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले आहे.

Tags:    

Similar News