राहुल गांधींवर केस करणाऱ्या RSS कार्यकर्त्याला कोर्टाचा दणका, अनुपस्थित राहिल्याने १ हजार दंड

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात RSS कार्यकर्त्याने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला सलग दुसऱ्यांदा स्थगिती देण्याची मागणी केल्याने न्यायालयाने RSS कार्यकर्ता राजेश कुंटे याला दणका दिला आहे. तर एक हजार रुपये राहुल गांधी यांना देण्याचे आदेश दिले आहेत.;

Update: 2022-04-22 14:15 GMT

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून RSS कार्यकर्ता राजेश कुंटे याने राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी येथे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणात राहुल गांधी यांनी सुनावणीला हजेरीही लावली होती. मात्र तक्रारदार वारंवार सुनावणीला गैरहजर राहिला. तसेच त्याने दुसऱ्यांदा सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केल्याने भिवंडी न्यायालयाचे प्रथम न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पालीवाल यांनी RSS कार्यकर्त्याला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर हा दंड राहुल गांधी यांना देण्याचे आदेश दिले आहेत.

कुंटे याने राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी नियमीत सुरू होती. मात्र गुरूवारी सलग दुसऱ्यांदा तक्रारदाराने खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावरून न्यायालयाने तक्रारदाराला दंड भरण्यास सांगितले. त्याबरोबरच यापुर्वीही न्यायालयाने तक्रारदाराला 500 रुपयांचा दंड केला होता. तो याचिकाकर्त्याने अजूनही भरला नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने तक्रारदाराला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर हा दंड काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देण्यात येणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मे रोजी पार पडणार आहे. त्यामुळे त्या सुनावणीवेळी तक्रारदाराला न्यायालयासमोर पुरावे सादर करावे लागणार आहेत.

RSS कार्यकर्ता कुंटे याने दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करताना याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात त्यांची रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यासंबंधी साक्षीदाराला हजर करण्याबाबत कुंटे यांनी न्यायालयाकडे विनंती केली होती. मात्र न्यायालयाने काही कारणास्तव परवानगी नाकारली. तर ती सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

गेल्या सुनावणीत तक्रारदाराने भिवंडीतील निजामपूर पोलिस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याला कोर्टात हजर करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. या पोलिसांने राहुल गांधींच्या वक्तव्याशी संबंधित अहवाल पोलिस स्टेशन मध्ये दाखल केल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितलं. मात्र, राहुल गांधी यांचे वकील एनव्ही अय्यर यांनी याला विरोध केला. त्यानंतर दंडाधिकारी जे.व्ही. पालीवाल यांनी प्रस्तावित साक्षीदाराची साक्ष तेव्हाच ग्राह्य धरली जाईल जेव्हा तक्रारदाराच्या सर्व तक्रारी प्रथम ऐकल्या जातील, असा निर्णय दिला.

काय आहे प्रकरण?

`महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे,` असं वक्तव्य राहुल गांधी यांनी २०१४ च्या प्रचारसभेत केल्याचा दावा करत संघकार्यकर्त्यांने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं संघाची प्रतिमा मलिन झाल्याचं याचिकार्त्याचं म्हणण आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधीहत्येला जबाबदार असल्याचं, वक्तव्य केलं होतं. सुरवातीला भिवंडी कोर्टामध्ये या याचिकेवर सुनावणी झाली होती. एकदा राहुल गांधी यांनी सुनावणीला हजेरी देखील लावली होती. सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी कोर्टापुढे निष्पाप असल्याचे सांगितले होते.

राहुल गांधी यांनी कोर्टात हजर राहिले असताना कोणत्याही परीस्थितीत वक्तव्यावर माफी मागणार नाही, अशी भुमिका घेतली होती. तसेच ठाणे दिवाणी न्यायालयानं याचिकार्त्यांनं सादर केलेली भाषणाची सीडी पुरावा म्हणुन ग्राह्य धरणार नाही असा निकाल दिला होता. त्यानंतर कोर्टाने याचिकाकर्त्याने सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केल्याने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

Tags:    

Similar News