केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुंबई दौरा संपल्यानंतर 8 जानेवारीला भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. गडकरी यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुंनगटीवार यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली आहे.
या बैठकीत राज्यातील पदवीधर निवडणूकीच्या पराभवाबाबत चर्चा करण्यात आली. तसंच आगामी पाच महानगरपालिका साठी रणनीती तयार करण्यासंदर्भात देखील बातचीत झाली. दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीत राज्यातील संघटनात्मक स्थितीबाबत मंथन झाल्याची चर्चा आहे.
मात्र, राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून शिवसेना आणि कॉंग्रेस मध्ये वाकयुद्ध रंगलेलं असताना आणि नितिन गडकरी यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांची दिल्लीत अशी तातडीने बैठक होत आहे. त्यामुळं महाराष्ट्राबाबत दिल्लीमध्ये नक्की काय खलबतं होत आहेत. हीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.