पूरग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी१० हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अशी माहिती दिली आहे. राज्याला महापुर आणि भुस्खलन या आपत्तींनी वेढलं असून राज्यातील ९ जिल्हे या आपत्तींनी बाधीत आहेत. या आपत्तीग्रस्त भागांना सध्या सत्ताधारी आणि विरोधक असे सगळेच राजकीय नेते भेट देऊन तेथील पाहणी करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगलीच्या पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते.
या दौऱ्यात त्यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी या पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेट दिली. सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधला; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याबाबत माहिती घेतली. "भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचं उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीनं तपासा", अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
त्या अगोदर पूरग्रस्तांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या शाळेत जाऊन पूरग्रस्तांशी अजित पवार यांनी संवाद साधला. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास दिला आहे. भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या बाजारपेठेची त्यांनी बोटीतून पाहणी केली.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत शहरात येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्टेशन चौकात येत पूर स्थितीचा आढावा घेत नकाशाद्वारे सर्व विभागाची माहिती घेतली. स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री जयंतराव पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम हेही सोबत होते. तसेच यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुरस्थितीची माहिती दिली. यावेळी ड्रोनद्वारे सुद्धा पुराची पाहणी अजितदादा पवार यांनी केली.
याशिवाय त्यांनी सांगलीच्या कवलापूर येथे पंडित नेहरू विद्यालय आणि दामाणी विद्यालय येथील पूरग्रस्त निवारा केंद्रांना भेट दिली. त्याठिकाणी आश्रय घेतलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी त्यांनी संवाद साधला व राज्य सरकार पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन दिलं.
तसेच पूरग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.