inflation : जेवण महागणार, घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ
गेल्या काही दिवसात देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलपाठोपाठ खाद्यतेल आणि डाळींच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यातच घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जेवण महागणार आहे.
देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईचा दर 15.8 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपुर्वी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जेवण आणखी महागणार आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वीच गॅसच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यामध्ये आता पुन्हा एकदा गॅसच्या किंमतीत साडेतीन रुपयांनी वाढ झाल्याने घरगुती गॅसची किंमत एक हजार रुपयांच्यावर गेली आहे. त्यातच मुंबईत 14.2 किलोग्रॅमची गॅस सिलिंडर 1002.50 रुपयांवर पोहचला आहे. तर कोलकत्तामध्ये गॅस सिलिंडरची किंमत 1029 तर चेन्नईमध्ये 118.50 रुपये इतकी आहे.
बारा दिवसात दुसऱ्यांदा वाढ
गेल्या बारा दिवसात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दुसऱ्यांचा वाढ झाली आहे. याआधी 7 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली होती. तर आता साडेतीन रुपयांची वाढ झाल्याने बारा दिवसात घरगुती गॅसच्या दरात तब्बल 53.50 रुपये इतकी वाढ झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महागाईचा आलेख वाढतच आहे. त्यातच दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच आहेत. पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजी, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. त्याबरोबरच इतर वस्तुंच्याही किंमती वाढल्या आहेत. या सगळ्याचा फटका घरातील किचनवर बसत आहे. त्यामुळे जेवण महागणार आहे.