राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकराने सर्व जिल्हा प्रशासनांना परिस्थितीनुसार निर्बंध घालण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी माघी एकादशीला म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर शहर व आजुबाजूच्या दहा गावात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारीला रात्री १२ ते २३ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत संचारबंदी लागू असेल. असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. कोरोनाची स्थिती पाहता दशमीला म्हणजे २२ फेब्रुवारी आणि एकादशीला म्हणजे २३ फेब्रुवारीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे.
२२ फेब्रुवारीपासून २३ फेब्रुवारीपर्यंत रेल्वे,एसटी बसेस व खासगी वाहतूक पूर्णतः बंद न ठेवता सामान्य प्रवासी व अत्यावश्यक सेवेसाठी नियंत्रित स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार आहे. सामान्य प्रवाशी मंदिरापासून दूर अंतरावर उतरतील याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२३ फेब्रुवारीला संपूर्ण पंढरपूर शहरासह चिंचोली भोसे,शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, गादेगाव, कौठाळी, शिरढोण, भटुंबरे, कोर्टी या गावांमध्येही संचारबंदी असणार आहे. माघी यात्रेत पंढरपूरला २५० हून अधिक पायी दिंड्या येतात. मात्र कोरोनामुळे त्यांना पंढरपूरमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे.