औरंगाबादमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता अखेर औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते, तसेच स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या अंशतः लॉकडाऊनचे नियम सुद्धा लोक पाळत नसल्याचं दिसून येत होते. त्यामुळे अखेर शनिवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी संयुक्तरीत्या आदेश काढले असून औरंगाबाद जिल्हा हद्दीत 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात पाचपेक्षा अधिक लोकांना जमा होता येणार नाही. तर काम नसताना बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.