महाविकास आघाडीच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा- भुजबळ
महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे
दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अश्या प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात भरसभेत झालेली बाचाबाची, मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आमदार कांदे समर्थकांनी केली घोषणाबाजी आणि आता आमदार कांदे यांना आलेली धमकी यावरून राजकिय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच ज्यांनी आपल्याला उघड-उघड विरोध केला अशा आमदार कांदे यांच्या संरक्षणासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पोलिसांनी निर्देश दिल्याने याचीही वेगळीच चर्चा होताना दिसत आहे.