कुटनीती करून किंवा दुसऱ्यांना संपवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका.... आ. डॉ. संजय कुटे यांचे पत्र

Update: 2024-12-16 17:04 GMT

नमस्कार !

मी आमदार डॉ. संजय कुटे आदरणीय श्रीराम कुटे गुरुजी यांचा मुलगा आहे, आणि उर्मिलाताई यांच्यासारख्या प्रेम वत्सल्य असणाऱ्या मातेचा मुलगा आहे, एक शिक्षकाचा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर सुसंस्कृत संस्कार केले आहेत, माझ्या आईवडिलांनी मला शिकवले आहे, महत्वकांक्षा जरूर ठेवावी पण ती राक्षसी नसावी.

दुसऱ्यांचा जीव घेऊन किंवा कुटनीती करून किंवा दुसऱ्यांना संपवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या कर्तव्याने मेहनतीने सेवेने, चांगले आणि प्रामाणिक काम करून तुम्ही पुढे गेले पाहिजे. आयुष्यात आपण किती पुढे गेले पाहिजे हे वेळ आणि काळच ठरवत असते आणि याचं विचारांवर जगणारा मी एक सामान्य लहान कार्यकर्ता आहे.

माझ्या आईवडिलांची शिकवण आहे वास्तविकतेत जगणे शिका आणि मी व माझे कुटुंब सदैव वास्तविकतेत जगत आले आहे. आजची वास्तविकता जि आहे ती आम्ही स्वीकारली आहे आणि कार्यकर्त्याना व माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना माझे एकच सांगणे आहे की वास्तविकतेत जगणे शिका. आज जि वास्तविकता आहे त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करा आणि भविष्याचा वेध घेऊन अजून चांगले काम करा.

बालपणापासून माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संस्कार झालेले आहेत, लहानपणापासून पिंगळे सरांच्या शाखेत जाणारा मी एक स्वयंसेवक आहे. त्यामुळे संघांमध्ये जि शिकवण मिळाली ती हीच आहे त्याग, समर्पण, सेवा आणि राष्ट्रप्रथम. त्यागामध्ये मी कुठे कमी पडलो असे मला वाटत नाही ज्या ज्या वेळी पक्षाने मला त्याग करायचा सांगितलं तेव्हा मी चांगल्या मनाने त्याग सुद्धा केलेला आहे. आज सुद्धा पक्षाने मला थांबवले याचे मला जरासुधा दुःख नाही कारण शेवटी स्वयंसेवक असल्याने एका स्वयंसेवकाला हे स्वीकारावेच लागते. समर्पनामध्ये कुठे कमी पडलो असे मला वाटत नाही तरीसुद्धा पार्टीमध्ये काम करत असताना ज्या ज्या भूमिका मला पक्षाने दिल्या त्या मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माझ्यामध्ये जेवढी क्षमता आणि शक्ती होती ती पक्षासाठी वापरली आहे.

पण तरीसुद्धा मला स्वतःला असं वाटायला लागत की पार्टीच्या ज्या अपेक्षा होत्या पार्टीला जे हवे होते ते मी देऊ शकलो नसेल, कदाचित त्यामध्ये मी कमी पडलो असेल ते मी मान्य करतो त्याचप्रमाणे सेवा हा माझा पिंड आहे, कुटनीती मला कधी जमली नाही राजकारणमध्ये कुटनीती मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते पण माझ्या स्वभावात आणि संस्कारात कुटनीती कुठेही नाही त्यामुळे कदाचित मी या प्रवाहात मी कुठेतरी बाजूला राहण्याचा प्रसंग माझ्यावर आला आहे.

तरी सुद्धा मी आयुष्यात कुटनीती कुठेही वापरणार नाही माझ्यावर जे संस्कार आहेत तेच राजकारण आणि समाजकारण मी करणार आहे. समाजाची सेवा, गोरगरीब, दीनदलित, दुःखी, कष्टी, शेतकरी - शेतमजूर या सर्वांची सेवा मी करत राहणार आहे, आज जरी मला मंत्रिपद मिळाले नसले तरी माझी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आणि आग्रह सुद्धा आहे की सर्वांनी शांत राहावं सेवेचे जे पवित्र कार्य आहे ते आपण करत राहू. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी ज्या पद्धतीने अंत्योदय हा विचार आपल्याला दिला आहे, त्यामुळे शेवटच्या माणसाचा आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये पुनः एकदा चांगले परिवर्तन आपल्याला करायचे आहे.

भारतीय जनता पक्ष व श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून आपले सेवा कार्य आपण अजून जोमात चालू करू कारण माझा जन्म हा सेवा करण्यासाठी झालेला आहे. राजकारना मध्ये पदे येतात आणि जातात, राजकारणात कुणाला काही मिळतं कुणाला काही मिळतं नाही पण सेवा या कार्यापासून आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे आपले सेवा कार्य आपण अखंड चालू ठेवणार आहोत. राष्ट्रप्रथम हे जे आपल्यावर संस्कार आहेत त्यातही आपण कुठे कमी पडणार नाही, आणि जेव्हा देशाचा आपण विचार करतो तेव्हा आपल्यासोबत काय घडलं किंवा काय घडतं आहे याचा कधीच विचार केला नाही पाहिजे. मला माहिती आहे मतदार संघातील असो, जिल्ह्यातील असो वा राज्यातील माझा चाहता वर्ग हा आपल्या सर्वांचा आहे, निश्चित त्यांना वाईट वाटले असेल दुःख होत असेल परंतु त्यांना माझे सांगणे आहे, मी आणि आपण सर्व पुन्हा एकदा जोमाने सेवा कार्य हाती घेणार आहोत. पद आज आहे उद्या नाही पदामुळे सेवा कार्य थांबता कामा नये. मतदार संघातील जनतेने अतिशय विश्वासाने मला सलग ५ वेळेस निवडून दिले आहे. ज्या विश्वासाने त्यांनी निवडून दिले त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. माझे जे स्वप्न जळगाव जामोद मतदारसंघाबद्दल आहे ते पूर्ण करणारच आहे. या पाच वर्षातील माझं जे व्हिजन आहे ते मी पूर्ण करणार आहे त्यामुळे कुणीही नाराज होऊ नये !

पक्षाने हा निर्णय का घेतला असेल हे मी सुद्धा समजू शकलेलो नाही, तसेही तो पक्षाचाच अधिकार आहे आणि आता समजून घेण्याची मला आवश्यकता सुद्धा वाटत नाही शेवटी मला हेच वाटत आहेत कि मीच कुठेतरी यामध्ये कमी पडलो आहे, त्यामुळे कदाचित पक्षाने हा निर्णय घेतला आहे. परंतु माझा पक्षावर अजिबात रोष नाही. भाजपा हे आपले सर्वांचे घर आहे आणि घरापासून कधीच रुसायचे नसते घरामध्ये कधीकधी मनाविरुद्ध निर्णय हे होत असतात आणि ते मोठ्या मानाने स्वीकारावे लागतात. हे निर्णय जे स्वीकारतात ते आयुष्यात कधीहि पुढेच जात असतात. सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन यापुढे कार्य करावे कुणीही नाराजी प्रकट करू नये. मला जाणीव आहे आपण सर्वजन अतिशय भावनिक झालेला आहात, मतदारसंघातील नाही तर राज्यातील अनेक आपल्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता मित्रजन हे अतिशय नाराज झालेले आहेत. सर्वांचे मला फोन येत आहेत त्या सर्वांचा मी ऋणी आहे कि ते आज भक्कम पणे माझ्या पाठीशी आहेत. आज मला समजले आहे कि राज्यात माझा चाहता वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.

त्याचप्रमाणे अधिकारी वर्ग जो मतदारसंघापासून तर मंत्रालयापर्यंत आहे त्या सर्वांणी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय महत्वाच्या माझ्यासाठी आहेत. त्यांना विश्वास बसत नाही आहे कि मला मंत्रीपद मिळाले नाही त्या सर्वांची अपेक्षा होती कि मंत्री व्हावे. आता जे झाले ते झाले माझा कुणावरही दोष नाही आहे, माझा कोणावरही आरोप नाही.

आम्ही सर्व भावंड जे आहे ते सुशिक्षित आहोत त्यामुळे आमचे कुटुंब कसे आहे हे सर्वांना माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे. परंतु मी एकच सांगेल मी जो आहे तो माझ्या जनतेसमोर आहे. तुम्ही एक चांगला कार्यकर्ता समाजसेवा करणारा कार्यकर्ता, सेवाभावी कार्यकर्ता म्हणून समाजाचे मोठे नुकसान केले आहे. हे तुम्हाला आता समजायला लागेल. मी जे नाही ते तुम्ही मला बनवण्याचा प्रयत्न केला आहात पण मी सेवा, समर्पण कदापि सोडणार नाही. यापुढे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या.

मी माझ्याकडून कुणाचे नुकसान होईल अश्या अफवा किंवा कुणाची प्रतिमा मलीन केली नाही आणि करणार पण नाही परंतु तुम्ही कार्यकर्ते नाराज जरी असलात तरी आपली नाराजी व्यक्त करू नका कुणालाही त्रास देऊ नका, पक्षावर किंवा आपल्या नेत्यांवर शिंतोडे उडवू नका आपण संस्कारी आहात. मतदार संघातील कोणत्याही युवकाला वीस वर्षात कधी बिघडू दिले नाही आधी घर संसार शिक्षण घेऊनच राजकारण करण्याची प्रेरणा दिली आहे यापुढे सुद्धा हीच शिकवण माझी असणार आहे.

माझा माझ्या वरिष्ठांवर विश्वास आहे, आणि तो कधीही कमी होणार नाही. आज जे माझ्यासोबत घडले त्याचे मी कधीही चिंतन करणार नाही, एक नवी दिशा एक नवी उमंग, नवीन उत्साह आणि पुन्हा नव्याने दिनदलित, शेतकरी शेतमजूर बांधवांच्या सेवेत मी असणार आहे. जे पाच वर्ष पुन्हा मला दिले आहेत त्याचे सोने मी केल्या शिवाय राहणार नाही. पुन्हा नव्या जिद्दीने मी आता कामाला लागतो आहे. आपण सुद्धा संयम ठेऊन नाराज न होता जनसेवेसाठी सज्ज व्हायचे आहे. या शासनामध्ये जे मंत्री झाले आहेत त्यांचे अभिनंदन करतो, एक दूरदृष्टी असलेला नेता आता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. माझा लहान भाऊ असलेल्या आकाश फुंडकर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो एक मोठी संधी पक्षाने त्यांना दिली आहे, एक युवा मंत्री म्हणून त्यांचे कार्य राज्याला पहायला मिळणार असल्याचा आनंद आहे.

आता पुन्हा एकदा आपण संपूर्ण ५ वर्षे आमदार आहोत त्यामुळे सर्वांनी सर्व विसरून कुणालाही न दुखवता आपण आपले कार्य करायचे आहे, कुणावरही आरोप करायचे नाहीत, माझे कार्यकर्त्यांना एक आवाहन आहे संयम ठेवा विरोधी पक्षाचा जरी असला तरी एक चांगले संबध ठेवा कारण तोसुद्धा आपलाच आहे. कुठेही राजकीय वैर करू नका. आपले विचार जपा एवढीच विनंती करतो. अनेक कार्यकर्ते नागपूर येथे आलेले आहेत व अनेक कार्यकर्ते हे नागपूर येथे निघण्याच्या तयारीत आहेत या सर्व कार्यकर्त्यांचा संताप व त्यांच्या भावना मी समजू शकतो, या सर्वांना विनंती आहे कि हा संताप त्यांनी माझ्यावर व्यक्त करावा, इतर कुणावरही व्यक्त करू नये तसेच कोणीही नागपूरला यायची गरज नाही मी स्वतः जळगाव जामोद येथे येत आहे.

छोडो कल कि बाते

कल कि बात पुराणी

नये दौर मे लिखेंगे

मिलकर नई कहाणी !

जय हिंद जय महाराष्ट्र 


Tags:    

Similar News