विधिमंडळात राष्ट्रवादी बाबत संभ्रम कायम

Update: 2023-07-17 14:03 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे अनेक आमदार अनुपस्थितीत

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांकडून आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला जात असतानाच काल राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांकडे धाव घेतली तर आज आमदारांनी पुन्हा शरद पवारांकडे धाव घेऊन आशीर्वाद मागितले.

या सगळ्या राजकीय संभ्रमाचे प्रतिबिंब सभागृहात देखील उमटले. विधानसभेचे कामकाज सुरू होताच शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटाकडील अनेक आमदार सभागृहात अनुपस्थित असल्याने नेमके कोणाच्या बाजूने किती संख्याबळ आहे हे नेमकेपणाने समजू शकलेले नाही.

अधिवेशनाच्या दोन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्समध्ये उभी फूट पडून अजित पवारांसह अनेक आमदार सत्तेत सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार व शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असून अनेक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून शह-काटशहाचे राजकारण सुरु झाले होते.

त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री पदाची शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांना वगळून उर्वरीत सर्व आमदारांची विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती.

अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच पहिल्याच दिवशी अनेक आमदारांनी सभागृहात येणे टाळले. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार होते, याबाबत पहिल्या दिवशी संभ्रम कायम राहिला. अजित पवार गटाचे असलेले नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्षांसाठी राखीव असलेले आसन हे विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेतेच्या बाजुला असलेल्या आसनावर ते बसले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असले तरी त्यांच्यासाठी विरोधी आणि सत्ताधारी बाकावर अशी आसन व्यवस्था करण्यात आली नव्हती. विधिमंडळाच्या लेखी राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष असल्याने विरोधी पक्षांच्या ठिकाणीच त्यांची आसन व्यवस्था होती. परंतु, सत्ताधारी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढल्याने राष्ट्रवादीसाठी शेवटच्या बाकापर्यंत आसन व्यवस्था करण्यात आली होती.

सभागृहात उपस्थित आमदार

शरद पवार समर्थक आमदार

१ - जयंत पाटील

२ - अनिल देशमुख

३ - बाळासाहेब पाटील

४ - राजेश टोपे

५ - प्राजक्त तनपुरे

६ - सुमन पाटील

७ - रोहित पवार

८ - मानसिंग नाईक

९ - सुनील भुसारा

अजित पवार गट

नऊ मंत्र्यांसह

१ - बबन शिंदे

२ - इंद्रनील नाईक

३ - प्रकाश सोळंके

४ - किरण लहमाटे

५ - सुनील शेळके

६ - सरोज अहिरे

विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांपैकी शशिकांत शिंदे, अरुण लाड, एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. विक्रम काळे, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण, रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर बाबाजानी दुराणी यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही.

एकंदरीतच सर्व दिवसभराचा घटनाक्रम झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि सलग दोन दिवस राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार शरद पवारांना भेटण्यास येत आहे. शरद पवारांनी त्यांची भूमिका येवल्याच्या सभेत स्पष्ट केली आहे पुन्हा पुन्हा भूमिका मांडण्याची गरज नाही आम्ही विरोधात बसणार म्हणजे बसणार असेही त्यांनी खडसावून सांगितलं.

Full View

Tags:    

Similar News